क्षत्रिय गल्ली येथील व्यापारी एकत्र आले पाहिजेत, समाजात एकोपा राहावा यासाठी १९३५ साली एका छोट्याशा मंदिरात सहा फूट गणेश मूर्तीची स्थापना करण्यात आली होती. मंडळाने आजपर्यंत विविध सामाजिक उपक्रम राबवले आहेत. अनेक गरजूंना सायकल वाटप, स्वच्छता अभियान, शालेय साहित्याचे वाटप यासह विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात. पुढे मंडळाची व्याप्ती वाढत गेली. कालांतराने गणेशोत्सव आकर्षक करण्यासाठी शिस्तबद्ध लेझीम पथकाची निर्मिती करण्यात आली. सहाशे ते सातशे कार्यकर्त्यांचा सहभाग असतो. मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते असूनदेखील हेवेदावे होत नाहीत, यामुळेच सावजी गणपतीचे नाव मानाने घेतले जाते. गणेशोत्सवासाठी अनेक मंडळांचे कार्यकर्ते देणगी घेण्यासाठी फिरत असतात. काही ठिकाणी तर जबरदस्तीने वर्गणी वसूल केली जाते; परंतु याला अपवाद आहे ते सोमवंशीय सहस्त्रार्जुन क्षत्रिय समाज श्री गणेश पूजा मंडळ. या मंडळाचे कार्यकर्ते कधीही कोणाला देणगी मागत नाहीत. क्षत्रिय गल्ली ही शहरातील मोठी बाजारपेठ; परंतु सर्व जण स्वतःहून देणगी देतात. सोलापूरच्या सोमवंशीय सहस्त्रार्जुन क्षत्रिय समाज श्री गणेश पूजा मंडळाच्या वतीने वतीने रामनवमी, तुकाराम बीज, एकनाथषष्ठी यासारख्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. मंडळाची www. savjiganpati.com या नावाने वेबसाईट तर SSK Shri Ganesh Puja Mandal असे फेसबुक पेज आहे. यावर रोजच्या पूजेचे फोटो व व्हिडिओ शेअर केले जातात. समाजातील प्रत्येक व्यक्तीच्या घरी गणपतीची प्रतिष्ठापना करण्यात येते व त्याचे सातव्या दिवशीच विसर्जन करण्यात येते. हा सोहळादेखील विशेष आकर्षक असतो. सर्व गणपतीचे विसर्जन एका रांगेत केले जाते. मंडळाची मिरवणूक अत्यंत शिस्त पद्धतीने निघते. लेझीम पथकामध्ये मुले, महिला आणि तरुणांचा सहभाग असतो. प्रत्येक वर्षी उत्कृष्ट लेझीम पथकाचा मानदेखील या मंडळाला मिळत आहे. प्रदूषणमुक्त मिरवणुकीसाठी गुलाबाच्या वापर केला जातो. प्रदूषण टाळण्यासाठी पारंपरिक वाद्यांचा वापर होतो. मंडळातर्फे राष्ट्रीय स्तरावर क्रिकेट स्पर्धेचे रेल्वे मैदान येथे आयोजन केले होते. यामध्ये एकूण सोलापूरसह परराज्यातून १८ संघांनी सहभाग नोंदवला. विजयी संघास सावजी गणपती ट्रॉफी आणि रोख ३१ हजार रुपये, उपविजेत्या संघास २१ हजार रुपये आणि ट्रॉफी देण्यात आली. अन्य संघांचाही सन्मान करण्यात आला. यासारखे मंडळाकडून विविध कार्यक्रम या उत्सव काळामध्ये घेतले जातात.